सांगली - जिल्ह्यात गेल्या आठवड्यात रुग्णांना विनाकारण आपला जीव गमवावे लागल्याच्या काही घटना घडल्या आहेत. याबाबत जिल्हाभरात संताप व्यक्त होत आहे. वाळवा तालुका प्रशासनाने काही खासगी रुग्णालये अधिग्रहित केली होती. अधिग्रहण आणि प्रत्यक्ष उपचार सुरू करण्याच्या प्रक्रियेत मात्र डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या ताळमेळात गोंधळ असल्याचा प्रकार पुढे आला. या प्रकरणात बस स्थानकाच्या जवळील आधार हॉस्पिटल चर्चेत आले. प्रशासनाने आज सकाळी रुग्णालयाला नोटीस बजावून डॉ. योगेश वाठारकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कोरोना उपचार सुरू करण्यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे.
सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आधार हॉस्पिटलमध्ये कोव्हिड सेंटर सुरू करण्याचे आदेश देऊनही त्याला प्रतिसाद न दिल्याने डॉ. योगेश वाठारकर यांच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक नरसिंह रामराव देशमुख यांनी याबाबत इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या 28 ऑगस्टच्या आदेशानुसार कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी डॉ. वाठारकर यांचे आधार हॉस्पिटल अधिग्रहित करण्यात आले आहे. परंतु डॉ. वाठारकर यांनी पुरेसा वेळ व सूचना मिळूनही कोरोना साथ रोगाच्या अनुषंगाने शासकीय आदेशाची पूर्तता केली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या कायदेशीर आदेशाचा भंग करून अवमान केला. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.