सांगली - पोलीस आणि गावगुंडांच्या जोरावर हे सरकार चालत आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघा़डी सरकारवर केली आहे. तसेच 'अटॅक इज बेस्ट डिफेन्स' त्यामुळे अंगावर गेल्याशिवाय काही होणार नाही, असा कानमंत्र चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे. सांगलीतील भाजप जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
हेही वाचा - जुन्या गोष्टी मलाही माहिती आहेत, त्या टप्प्याटप्प्याने बाहेर काढणार - नारायण राणे
- ठाकरे यांनी इतिहासात पहिल्यांदाच सर्वपक्षीय बैठक घेतली -
भाजपच्या सांगली जिल्हा नूतन कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले. या वेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, विलासराव जगताप, विलासराव शिवाजीराव देशमुख यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. या उद्घाटन प्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांना आपण वारंवार सांगत होतो, की सर्व नेत्यांशी चर्चा करा, मुख्यमंत्री झाल्यानंतर इतिहासात पहिल्यांदा आता उद्धव ठाकरे स्वत:हून सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेत आहेत, असा टोला पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
- अनिल परबांवर गुन्हा दाखल होणार?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील कारवाईबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पोलीस व गावगुंडांच्या जोरावर हे सरकार चालत आहे. त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या आपण सक्षम आहोत. त्यामुळे 22 महिन्यात एकही केस ते जिंकू शकले नाहीत. काल पण ते हरले आहेत. आज आपल्यासोबत मुंबईत अदृश्य वकिलांची टीम काम करत आहे. अनिल परब यांच्यावर याचिका दाखल करण्यासाठी काम सुरू आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
- 'अटॅक इज बेस्ट डिफेन्स' -
केस दाखल होतात, पण जास्तीत जास्त केस दाखल होणे म्हणजे राजकीय दृष्ट्या चांगली गोष्ट आहे. आज 3 पक्ष शेवटची फडफड करत आहेत, तर कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे. तसेच कार्यकर्त्यांनी आक्रमक झालं पाहिजे, 'अटॅक इज बेस्ट डिफेन्स' त्यामुळे अंगावर गेल्याशिवाय काही होणार नाही, असा कानमंत्र चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.
- तर कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही -
22 महिन्यात भाजप कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला. पण, कोणीही फुटला नाही. उलट आम्ही गनिमी काव्याने काम करत असून, त्यांचे कार्यकर्ते फोडत आहोत. तसेच ओबीसी राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका भाजप होऊ देणार नाही. तसेच जी पोटनिवडणूक होईल, ती भाजप जिंकणार आणि देगलूर येथीलही पोट निवडणूक भाजप जिंकणार, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्री आणि फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा; तर्कवितर्कांना उधाण