सांगली - माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि भाजपमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. पुणे पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने हा संघर्ष चव्हाट्यावर येण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सदाभाऊ खोत यांची आज बैठक होत आहे. खोत यांनी पदवीधर निवडणुकीत उभे केलेले उमेदवार आणि अनेक गोष्टींवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे नाराज खोत यांची मनधरणी करण्यात भाजपला यश मिळणार की खोत यांचा भाजपशी घेण्यात येत असलेला सवतासुभा वाढणार हे लवकरच स्पष्ट होईल.
सदाभाऊंनी दिले वेगळी चूल मांडण्याचे संकेत
रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुणे पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीच्या माध्यमातून भाजपविरुद्ध बंडाचा निशाणा फडकवला आहे. भाजपसोबत आपण असलो तरी आपली स्वतंत्र पक्ष असून तो वाढवण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार असून त्यादुष्टीने आता यापुढे सर्व निवडणुका रयत क्रांती संघटना स्वबळावर लढवणार असल्याचे माजी मंत्री खोत यांनी स्पष्ट केले आहे. तर पदवीधर निवडणुकीत रयत क्रांतीच्या उमेदवारीमुळे भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. एकूणच खोत यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर नाराजी असल्याचे स्पष्ट संकेत देत, वेगळी चूल मांडण्याचा इशारासुद्धा दिला आहे. यामुळे खोत हे भाजपवर नाराज आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
नाराजी दूर करण्यासाठी चंद्रकांत पाटील खोतांच्या भेटीला
सदाभाऊ खोत यांनी पुणे पदवीधर मतदार संघाच्या रयत क्रांतीच्या उमेदवाराचा प्रचारही सुरू केला आहे. त्यामुळे भाजपसमोर घटकपक्ष असणाऱ्या रयत क्रांतीच्या या उमेदवारीमुळे अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदाभाऊ खोत यांची नाराजी या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज सोमवारी इस्लामपूर मध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार आहेत. त्यानिमित्ताने इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत यांची देखील भेट घेणार आहेत. सदाभाऊ खोत आणि चंद्रकांत पाटील यांची यावेळी बैठक पार पडणार असून यामध्ये सदाभाऊ खोत यांची नाराजी आणि त्याशिवाय पुणे पदवीधर उमेदवार माघार याबाबत चर्चा होणार आहे. चंद्रकांत दादा खोत यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी ठरतील का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा - शरद पवारांचा सांगली दौरा : 'कमी पाण्यात पैसे देणारे फळबागांशिवाय दुसरे पीक नाही'
हेही वाचा - बैलगाडीवरील शर्यत बंदी उठवा... सांगली ते मुंबई पदयात्रेला सुरुवात