सांगली - चांदोली धरणात सध्या अत्यल्प पाणीसाठा शिल्लल आहे. या धरणात केवळ 1.76 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक असल्याने वारणा काठच्या गावांवर पाणी टंचाईचे ढग निर्माण झाले आहेत. येत्या ८ दिवसात पाऊस पडला नाही, तर वारणा काठच्या नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
सांगली जिल्ह्यातील पश्चिम भागात यंदा दुष्काळ तीव्र स्वरूपात जाणवत आहे. डोंगरी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात वाढत्या तापमानामुळे चांदोली धरणातून पाणी साठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. तर यंदाच्या वर्षी वळवाच्या पावसानेही पाठ फिरवल्याने धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. 32.24 टीएमसी पाणीसाठा असणाऱ्या चांदोली धरणात सध्या केवळ 1.76 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मात्र, धरणातून सांडव्यातून 1700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सुरू आहे. तर दुसरीकडे पावसाच्या अंदाजमानावर धरण प्रशासन अवलंबून असून, येत्या आठवड्यात जर पाऊस पडला नाही, तर धरणातील पाणीसाठा संपून धरण कोरडे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वारणा काठच्या गावांवर पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे.