सांगली - गेल्या पाच दिवसांपासून शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस पडत असून आज सहाव्या दिवशीसुद्धा संतत धारा चालूच आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने गेल्या २४ तासात ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून १७ टीएमसी पाणीसाठा धरणात आहे.
सांगलीच्या शिराळा तालुक्यात गेल्या सात दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. तर चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये ६५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या सहा दिवसात ६२९ मिलिमीटर पाऊस धरण पाणलोट क्षेत्रात झाला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
अतिवृष्टी आणि धुवांधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून वारणा नदीला पूर आला आहे. पुरामुळे नदीवरील काखे-मांगले आणि कोकरूड-रेठरे असे दोन बंधारे तीन दिवसांपासून पाण्याखाली आहेत. यामुळे शिराळा तालुक्यापासून जवळपास आठ गावांचा संपर्क तुटला आहे. २६ मिलिमीटर इतका पाऊस शिराळा तालुक्यात गेल्या २४ तासात नोंदवला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ कायम असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे.