सांगली - निवडणुकीत निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवार जोर लावत असतो. मात्र, नशीब साथ देईल असे नाही. पण, सांगलीच्या जत तालुक्यातील एका उमेदवाराला नशीबाची अशी काही साथ मिळाली की त्याने चक्क रस्त्यावरच जोर-बैठका काढल्या. तर समर्थकाने थेट कोलांट उड्या मारत आनंद व्यक्त केला आहे.
दोन्ही उमेदवारांना समान मते
ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडून प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात आली. कोणी देव पाण्यात ठेवले तर कोणी मतदारांच्या पाया पडण्यापर्यंत सर्व हातखंडे वापरले. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शिंगणवाडी याठिकाणी काँग्रेसच्या पॅनलकडून विश्वजित हिप्परकर हे निवडणूक रिंगणात होते. अत्यंत अटीतटीची त्यांची ही निवडणूक पार पडली आहे. सोमवारी (दि. 18 जाने.) मतमोजणी पार पडली आहे. या मतमोजणीत हिप्परकर यांना व त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला समान मते मिळाली आणि निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या समोर सुद्धा आता कोणाला विजयी करायचा हा प्रश्न पडला होता.
चिठ्ठीच्या जोरावर उघडले नशीब
त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठीद्वारे विजयी करण्याचे जाहीर केले. दोन्ही उमेदवारांनी ते मान्य केले. आता दोन्ही उमेदवारांचे नशीब चिठ्ठीमध्ये बंद झाले. त्यामुळे कोणाची चिठ्ठी येणार याची प्रचंड उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. सोडत पद्धतीने या ठिकाणी चिट्टी उचलण्यात आली. चिठ्ठीतून विश्वजीत हिप्परकर यांचे नाव आले. त्यामुळे हिप्परकर यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आपल्या नशिबाच्या जोरावर मिळवलेल्या विजयाचा त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी मतदान केंद्राच्या बाहेर येऊन थेट रस्त्यावर जोर-बैठका मारत आपला नशीबाच्या जोरावर विजयी झाल्याच्या आनंद साजरा केला. तर यावेळी हिप्परकर यांच्या समर्थकांने रस्त्यावर कोलांटी उडी मारत. विजय आंनद व्यक्त केला आहे.
हेही वाचा - जलसंपदा मंत्र्यांच्या सासुरवाडीत राष्ट्रवादीचा उडाला धुरळा, भाजपने रोवला झेंडा