सांगली - सांगली महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी होणारी गर्दी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आता सांगली महापालिकेकडून 'कॉल सेवा' सुरू केली जाणार आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबत महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशी चर्चा करून सर्व आरोग्य केंद्रांना आवश्यक कर्मचारी देणार असल्याचेही महापौर सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
आरोग्य यंत्रणेचा घेतला आढावा
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावर उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापालिका सभागृहात मनपा अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक, तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांची बैठक घेऊन मनपाकडून सुरू असणाऱ्या उपाय योजनांबाबत आढावा घेतला. यावेळी सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून त्यांच्या कामाची माहिती महापौर सूर्यवंशी यांनी घेतली. याचबरोबर आरोग्यकेंद्रांना आणखी काय सुविधा लागणार आहेत, याबाबतही माहिती घेतली.
हेही वाचा - रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट, 8 जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह
अनेक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण करण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याने त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे. त्यामुळे, आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशी चर्चा करून सर्व आरोग्य केंद्रांना अधिकचा स्टाफ देण्याबाबत नियोजन केले जाईल, असे आश्वासन दिले. त्याचबरोबर, तिन्ही शहरात आता प्रभाग निहाय औषध फवारणीसाठी एकच नियमित फवारणी गाडी ठेवली जाईल. ज्यामुळे त्या, त्या भागातील सदस्यांना औषध फवारणीबाबत त्याचा उपयोग होईल, असे स्पष्ट करत कोरोनाच्या या संकटात सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिकांनी महापालिका प्रशासनाला साथ द्यावी आणि सर्वानी मिळून या संकटाचा सामना करू, असे आवाहन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केले.
लसीकरणासाठी कॉल सर्व्हिस
कोरोना लसीकरणासाठी महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर होणारी संभाव्य गर्दी पाहता आता लसीकरणासाठी कॉल सर्व्हिस सेवा सुरू केली जाणार असल्याचे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. यामध्ये संबंधित आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपलब्ध लसीनुसार नोंदणी केलेल्या नागरिकांना संपर्क साधून बोलावून लसीकरण करून घेतले जाणार. यामुळे लसीकरणासाठी थांबून राहिलेल्या लोकांना कॉल सेंटरमुळे फायदा होईल आणि आरोग्य यंत्रणेवरचा ताणही कमी होईल. याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी प्रशासनाला दिले.
हेही वाचा - लॉकडाऊनचा फेरफटका पडला महागात, पोलिस असल्याची बातवणी करून महिलेला लुटले