सांगली - भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीवरून आता चांगलेच वातावरण तापले आहे. सांगली जिल्ह्यातील मोठा पोलीस फौजफाटा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या झरे या गावी तैनात झाला आहे. नऊ गावात कालपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर आमदार पडळकर यांनी शर्यतीसाठी तयार केलेले मैदान पोलिसांनी जेसीबी लावून उकरून टाकले आहे. शिवाय, कोणत्याही परिस्थितीत बैलगाडी शर्यत होऊ देणार नसल्याचा निर्धार प्रशासनाने घेतला आहे. तर ठरलेल्या दिवशी (20 ऑगस्ट) बैलगाडी शर्यत होणारच, अशी ठाम भूमिका आमदार पडळकर यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे आता 20 ऑगस्ट रोजी बैलगाड्यांच्या शर्यती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
बैलगाडी शर्यत तर होणारचं - पडळकर
आटपाडीच्या झरे या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी 20 ऑगस्ट रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. यासाठी एक लाखांचे बक्षीसही जाहीर केले आहे. राज्यात बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी, यासाठी पडळकर यांनी या शर्यतीचे आयोजन केले आहे. याबाबत आमदार पडळकर म्हणाले, की 'येत्या 20 तारखेला बैलगाडी शर्यत ही होणारचं. शेतकऱ्यांची खिलार गाय आणि गोवंश वाचावा. बैलगाडीवर असंख्य कुटुंबं चालतात. त्यांना आधार मिळावा यासाठी छकडा-बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही शर्यत होणार आहे'.
सत्ताधाऱ्यांवर निशाणा
'पण या शर्यतीला हजारोच्या संख्येने पोलीस फोजफाटा तैनात आहे. बैलगाडीविषयी ज्यांनी प्रेम दाखवले, त्यांनी हे राजकारण थांबवावे. बैलगाडी शर्यत ही होणारच आणि येत्या 20 ऑगस्टलाच. बैलगाडी प्रती ज्यांचे बेगडी, नाटकी प्रेम केवळ मतासाठी आहे. त्यांचा बुरखा फाटला जाणार आहे. मात्र प्रशासनाने बैलगाडी शर्यतीला बंदी आणण्याचा आणि दडपशाही करण्याचा प्रयत्न करू नये. जर हे करताना कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील', असेही पडळकरांनी म्हटले आहे.
पोलिसांनी बैलगाडी शर्यत मैदान उकरले
बुधवारी (18 ऑगस्ट) झरे याठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डूबुले यांच्या नेतृत्वाखाली तासगाव, विटा, इस्लामपूर आणि सांगलीचे पोलीस उपअधीक्षक यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी जेसीबी लावून बैलगाडी शर्यतीसाठी तयार केलेले मैदान उकरून टाकले. तसेच झरे गावांमध्येही मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करण्यात आलेली आहे. बाहेरून येणार्या प्रत्येकाची या ठिकाणी कसून चौकशी करण्यात येत आहे.
हेही वाचा - अनिल देशमुखांना फरार घोषित करा, किरीट सोमय्यांची ईडीकडे मागणी