सांगली - ब्राह्मण समाजाची भावना दुखावल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी ( NCP MLC Amol Mitkari ) यांच्या विरोधात कठोर कारवाई करून, या पुढे ब्राह्मण समाजाची कोणतीही बदनामी होणार नाही, याची खबरदारी पोलिसांनी घ्यावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाच्यावतीने ( Brahmin Mahasangh File Complaint Against Amol Mitkari ) करण्यात आली आहे. सांगली जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ सांगली शाखेच्यावतीने ही मागणी करण्यात आली आहे.
मिटकरींकडून ब्राह्मण समाजाची बदनामी - इस्लामपूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कन्यादानबाबत भाष्य करताना वादग्रस्त वक्तव्य केला आहे. या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. आमदार मिटकरी यांच्याकडून ब्राह्मण समाजाची बदनामी करून टिंगलटवाळी करण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने करण्यात आला आहे.
आमदार मिटकरींवर कारवाई करा - या प्रकरणी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, सांगली शाखेच्यावतीने सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्या बद्दल तसेच हिंदू धर्मातील चालीरीतींची टिंगलटवाळी केल्या बद्दल कठोर कार्यवाही करण्याची मागणी करत सभा आयोजकांना समज द्यावी, त्याचबरोबर यापुढे कोणत्याही व्यासपीठावरून ब्राह्मण समाजाची बदनामी होणार नाही,याची खबरदारी पोलिसांनी घ्यावी,अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष मंगेश ठाणेदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाप्रमुख दीक्षित गेडाम यांच्याकडे निवेदनद्वारे करण्यात आली आहे.