सांगली - सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात वाहतुकीसाठी सवलत देण्यात आल्याने सांगली आणि कोल्हापूरकडे मोठ्या प्रमाणात वाहनांचा ओघ सुरू झालाय. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता बळावलीय. या पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूरच्या सीमा हाय अलर्टवर आहेत. जिल्ह्याच्या सीमांवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जिल्ह्यातून जवळपास ५० हजाराहून अधिक नागरिकांनी बाहेर जाण्यासाठी परवानगी मागितली आहे. तर गेल्या १४ चौदा दिवसांत सांगलीत २३ हजार ४३६ व्यक्ती बाहेरून दाखल झाल्या आहेत. हे सर्व नागरिक राज्य आणि जिल्ह्याबाहेरून दाखल झाल्याने महामारीच्या प्रसाराची जोखीम वाढली आहे.
सुमारे १५ हजांरहून अधिक व्यक्तींनी जिल्ह्यातील येण्यासाठी परवानगी मागितली आहे. यापैकी अनेकांना परवाने देण्यात आले असून संबंधित व्यक्ती मोठ्या संख्येने परतत आहेत. तर दुसरीकडे कोल्हापुरात देखील हा प्रश्न गडद होत आहे. कोल्हापुरात आतापर्यंत १५ हजार परप्रांतीय कामगार परतले आहेत. दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा एकमेकांना लागून असल्याने बंदोबस्त वाढवण्यात आलाय.
अंकली या ठिकाणी सांगली पोलिसांनी तर उदगाव टोलनाक्यावर कोल्हापूर पोलिसांच्या चौक्या तपासणी करत आहेत.