सांगली: सांगलीच्या जत तालुक्यातल्या 42 गावांमध्ये पाण्याच्या मागणीसाठी आता जोरदार उठाव सुरू झाला आहे. आणि कर्नाटकमध्ये जाण्यासाठी आता एकामागून एक गावे आग्रही असल्याचे पुढे येऊ लागले आहे. यातूनच सीमा भागामध्ये गावागावात कर्नाटक मुख्यमंत्र्यांचे पोस्टर झळखणे, कर्नाटकचे झेंडे फडकवण्या बरोबर कर्नाटक सरकारचा जयघोष होऊ लागलेला आहे. जत तालुक्यातील तिकोंडी, उमराणी गावापाठोपाठ सिद्धनाथ गावाने देखील ग्रामस्थांनी कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुकता दर्शवली आहे.
सरकारच्या विजयाच्या घोषणा: याबाबत ग्रामपंचायतीचा ठराव करण्याचा निर्णय घेतला. तर पाण्यासाठी कर्नाटकमध्ये जाण्याबाबत ग्रामस्थांनी कर्नाटकचे झेंडे हातात घेऊन गावातून पदयात्रा काढली. तसेच महाराष्ट्र सरकाराच्या धिक्काराच्या घोषणा देत कर्नाटक सरकारच्या विजयाच्या घोषणा दिल्या आहेत. महाराष्ट्र सरकारकडून पाणी देण्याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, अन्यथा आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ, असा इशारा दिला आहे.
पाणी वाटपाचा करार: कर्नाटक सरकारच्या सीमेवर असणाऱ्या जतच्या 42 गावांना तुबची योजनेतून पाणी मिळावे, या लढ्याला आता अंतिम स्वरूप प्राप्त होण्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. या प्रश्नावर जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह सर्वच पक्षाच्या प्रमुखांनी अनेकदा प्रयत्न केले होते. दोन्ही राज्यात पाणी वाटपाचा करार झाल्यास त्याचा दुहेरी फायदा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागाला होणार आहे. त्यामुळे या मागणीला अलीकडच्या काळात मोठा जोर लागला होता.