सांगली - सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बस्तवडे याठिकाणी जिलेटीन कांड्यांचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडला आहे. डोंगर फोडताना ही घटना घडली आहे. या घटनेने बस्तवडे परिसर हादरून गेला असून गावातील अनेक घरांना तडे गेले आहेत. तर घटनास्थळी 7 ते 8 आणखी कामगार असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
असा घडला स्फ़ोट -
डोंगर फोडण्यासाठी जिलेटीन कांडयांचा वापर करण्यात येत होता. ज्या ठिकाणी जिलेटीन कांड्या ठेवल्या होत्या, त्या ठिकाणी एक ट्रक उभा होता. त्या ट्रकने अचानक पेट घेतला आणि तिथे असणाऱ्या जिलेटीन कांडयांचा स्फोट झाला. तिथे जवळच काम करत असलेल्या कामगाराचा या स्फोटात मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्या कामगाराच्या मृतदेहाचे अवयव छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आले आहेत.
स्फोटाने गाव हादरून गेले -
बस्तवडे गावाच्या हद्दीतील हे डोंगर असून गावापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर हे डोंगर आहे. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण गाव हादरून गेले, तर डोंगराजवळ असणाऱ्या काही घरांना तडे गेले आहेत.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तासगाव पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने दाखल झाले. या घटनेतील जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाची स्थिती गंभीर आहे.