सांगली - सांगली महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा संघर्ष पाहायला मिळाला. ऑनलाइन सभेच्या मुद्द्यावरून भाजपाच्या नगरसेवकांनी पालिकेत जाऊन महापौरांना घेराव घातला, यामुळे महापौर आणि भाजपा नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दरम्यान सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाजपा नगरसेविकांनी प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत, ऑफलाईन सभा घेण्याची मागणी केली.
सांगली, मिरज कुपवाडा महापालिकेत भाजपाच्या सत्तांतरनानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी महापौरांच्या नेतृत्वाखाली ऑनलाईन सभा पार पडली. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र ही सभा सुरू झाल्यानंतर भाजपा नगरसेवक व सदस्यांना बोलू देण्यात येत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत, भाजपाने ऑफलाईन सभेचा आग्रह धरला. ऑफलाईन सभेच्या मागणीसाठी भाजपाच्या स्थायी समिती सभापती, गटनेते, माजी उपमहापौर यांच्यासह भाजप नगरसेवकांनी थेट महापालिकेच्या सभागृहात दाखल होऊन, ऑनलाईन सभेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. यावेळी भाजपा नगरसेवकांनी महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांना घेराव घातला, घेराव घातल्यानंतर भाजपा नगरसेवक धीरज सूर्यवंशी आणि महापौरांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर महापौरांनी सभा तहकूब केल्याची घोषणा केली.
भाजपा नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी
दरम्यान महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी भाजपा नगरसेवकांनी गोंधळ घातल्याचा आरोप केला आहे. भाजपाची सत्ता गेल्याने त्यांच्या नगरसेवकांनी मुद्दाम महापालिकेच्या सभेत राडा केला. आपण सभेत कोणावरही अन्याय केला नाही. सर्वांना बोलण्याची संधी दिल्याचे स्पष्टीकरण यावर महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिले आहे. तसेच याप्रकरणी संबंधित नगरसेवकांवर कारवाई करण्याबाबत आयुक्तांना पत्र देणार असल्याचेही आयुक्तांनी म्हटले आहे.
हेही वाचा - मुंबईत NCB ची मोठी कारवाई 2 कोटींचे ड्रग्ज जप्त