सांगली - महापालिका प्रशासनाविरोधात सत्ताधारी भाजपकडून आंदोलन करण्यात आले आहे. आयुक्तांविरोधात भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेसमोर धरणे आंदोलन करत आयुक्तांकडून विकासकामांची अडवणूक करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सांगली महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांवर पालिकेविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्याविरोधात भाजप नगरसेवकांनी आंदोलन केले आहे. महापालिकेच्या कार्यालयासमोर माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवकांनी धरणे आंदोलन केले. आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडून प्रस्तावित कामांच्या फाईल मंजूर करण्यात येत नाही, जाणून-बुजून आयुक्त विकासकामांमध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप यावेळी भाजप नगरसेवक व माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांनी केला आहे.
सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुरू असलेला वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे. आयुक्त विरुद्ध भाजप नगरसेवक असा सामना आंदोलनाच्या माध्यमातून सुरू झाला आहे. यावर आता भाजपचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.
हेही वाचा -
...म्हणून शाळा व्यवस्थापकाने विद्यार्थ्यांनाच 2 तास ठेवले ओलीस