सांगली- केंद्र सरकारच्या एनआरसी आणि सीएए कायद्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाकडून आज सांगलीत आंदोलन करण्यात आले. नागरिकत्व सुधारणा विधयेक रद्द करण्याच्या मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चाकडून सांगलीत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.
केंद्र सरकारने एनआरसी आणि सीएए कायदा करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचेच नव्हे तर संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या कायद्यामुळे भारतात राहणाऱ्या सर्व नागरिकांना जाचक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे, सदर कायदा देशाच्या नागरिकांना धोकादायक ठरणार असून तो रद्द करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाकडून आज देशभर आंदोलनाची हाक देण्याती आली. तीन टप्प्यात हे आंदोलन होत असून आंदोलनाचा पहिला टप्पा २० डिसेंबर पार पडला होता. आज ८ जानेवारी रोजी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन होत आहे. या आंदोलनात एनआरसी आणि सीएए कायद्याला विरोध म्हणून सर्वधर्मीय हजारो नागरिक सांगलीत एकवटले होते.
बस स्थानक नजीक असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शहरातील प्रमुख मार्गावरून स्टेशन चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंसह हजारो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी जाहीर सभेत बोलताना अनेक मान्यवरांनी केंद्र सरकारने आणलेला सीएए व एनआरसी कायदा रद्द करावा, अशी जोरदार मागणी केली.
हेही वाचा- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र बंदला सांगलीत प्रतिसाद