वाळवा (सांगली) - जिल्हा पोलीस दलातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यात येत आहे. तालुक्यातील दुकानांसमोर 'मास्क नाही तर नाही', अशा स्वरुपाचे फलक लावण्यात येत आहे. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव बघता कुरळप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात आहे.
तालुक्यातील कुरळप पोलीस ठाण्यांतर्गत 21 गावे येतात. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे कोरोनाच्या पार्श्वभूमावर सुरुवातीपासूनच खबरदारी म्हणून नवनवीन प्रयोग करून नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने जनजागृती करत आहेत. यासाठी व्यापारी वर्गांना विश्वासात घेऊन सर्व दुकानांसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत वेळ ठरविण्यात आली आहे. यावेळेतच दुकांनाना खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
तसेच प्रत्येक गावातून दिवसातून चार-चार वेळेस ते त्यांच्या पथकासह पेट्रोलिंग करुन विचारपूस करत आहेत. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून त्यांचे हे कार्य सुरू आहे. तर, आता 21 गावातील प्रत्येक दुकानांसमोर 'मास्क नाही तर माल नाही', अशा प्रकारचे फलक लावून मास्क वापरण्यासाठी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
स्वतः अधिकारी आणि पोलीस कर्मचारी संबंधित दुकानाला हे फलक लावत आहेत. तर यासाठी कुरळप गावातील व्यापारी संघटनेने ही अशाप्रकारे फलक तयार करून आपल्या दुकानाला लावले आहेत. यामुळे निश्चितच कोरोनाला हरवण्यासाठी मदत होणार आहे. दरम्यान, या मोहिमेमुळे 21 गावातील नागरिकांनी कुरळप पोलिसांचे कौतुक केले आहे.