सांगली - २७४ कोटी २ लाखांच्या थकीत वसुलीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे आमदार, भाजपच्या माजी आमदारांच्या साखर कारखान्यांसह सूत गिरण्यांचा लिलाव काढण्यात आला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामध्ये केन ॲग्रो साखर कारखान्यासह स्वामी रामानंद भारती आणि खानापूर सूतगिरणी या संस्थांचा समावेश आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतलेले साखर कारखाने, सूतगिरण्या आर्थिकदृष्ट्या संकटात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील थकबाकीदार असणाऱ्या कडेगावच्या रायगाव येथील केन अग्रो सहकारी साखर कारखाना, तासगाव येथील स्वामी रामानंद भारती सूतगिरणी आणि खानापूरमधील खानापूर स्पिनिंग मिल या तीन संस्थांवर लिलावाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. या तीनही संस्था राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या आजी-माजी आमदारांशी संबंधित आहेत. तासगाव येथील स्वामी रामानंद भारती सूतगिरणी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमनताई आर. आर. पाटील यांच्याशी संबंधित आहे. या सूतगिरणीची थकबाकी ही ५६ कोटी ४७ लाख आहे. तर खानापूर येथील खानापूर को-ऑ. स्पिनींग मिल शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्याशी संबंधित आहे. या सूत गिरणाचे २८ कोटी २१ लाख रुपये थकीत आहेत.
तर कडेगाव तालुक्यातील रायगाव येथील केन ॲग्रो अॅनर्जी हा साखर कारखाना भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा आहे. या कारखान्याकडे तब्बल १८९ कोटी ३४ लाख रुपये थकबाकी आहे. या थकबाकी पोटी सिक्युरीटायझेशन कायद्यांतर्गत जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने या तिन्ही संस्थांचा ताबा घेतला होता. शुक्रवारी या संस्थांच्या विक्रीसाठी लिलाव प्रक्रिया जाहीर केली आहे. ३ जुलैपर्यंत निविदा अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत तर ६ जुलैला निविदा उघडण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व कारखाने, औद्योगिक संस्था या दोन महिन्यांपासून बंद आहेत. त्यामध्ये जिल्हा बँकेने वसुलीचा तगादा लावून प्रमुख सहकारी संस्थांचा लिलाव सुरू केला. त्यामुळे राजकीय गोटात खळबळ माजली आहे.