सांगली - 87 कोरोना रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी अॅपेक्स केअर हॉस्पिटलमधील एका ब्रदरला अटक करण्यात आली आहे. अमीर खान असे या तरुणाचे नाव असून रुग्णालयातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी अमीर याला अटक केली आहे. आतापर्यंत अॅपेक्सप्रकरणी 2 डॉक्टर, सिस्टर, ब्रदर, रुग्णवाहिका चालक अशा 13 जणांना अटक करण्यात आली आहे.
रेमडेसिवीरचा काळाबाजार
मिरजेतील अॅपेक्स केअर हॉस्पिटलमध्येमधील 87 कोरोना रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत. मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलिसांनी आता या रुग्णालयातील एका ब्रदरला अटक केली आहे. अमीर खान (रा. मिरज) असे या तरुणाचे नाव आहे. अमीर यानी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी नातेवाईकांकडून आणलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत विक्री केल्याचा प्रकार तपासात समोर आला आहे. डॉ. महेश जाधव यांच्याशी असणारी जवळीक यामुळे अमीर याने रुग्णालयात असणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करत रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर द्यायचे असल्याचे भासवून बाजारातून काळाबाजाराने खरेदी करण्यात आल्याचा प्रकारही समोर आला आहे. यानंतर महात्मा गांधी चौकी पोलिसांनी अमीर खान याला अटक केली आहे.
आणखी काही जणांच्या अटकेची शक्यता
87 कोरोना रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी अॅपेक्स केअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. महेश जाधव यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू करत आतापर्यंत डॉ. महेश जाधव यांचा भाऊ डॉक्टर मदन जाधव याला अटक केली होती. तसेच 3 रुग्णवाहिका चालक त्याचबरोबर रुग्णालयातील सिस्टर, ब्रदर आणि महिला अकाऊंटंट अशा एकूण 12 जणांना अटक करण्यात आली होती. आता तो आकडा 13 झाला असून याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.