सांगली - मिरजेतील अपेक्स केअर रुग्णालयातील 87 कोरोना रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. सांगलीतील छातीरोग तज्ञ डॉ. शैलेश बरफे यास महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे.
डॉ. बरफे होते फरार...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मिरजेतील अपेक्स केअर सेंटर या रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. ज्यामध्ये व्हेंटिलेटर नसताना ते दाखवून उपचार करण्याबरोबर चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने 87 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर महेश जाधव यासह रुग्णालयातील कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, जाधव यांचा डॉक्टर भाऊ, एजंट असे 15 जणांना अटक केली होती. तर यामध्ये सांगलीतील छाती रोगतज्ञ डॉ. शैलेश बरफे यांचा सहभाग असल्याचे समोर आले होते. त्यानंतर डॉ. बरफे हे फरार होते. त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन देखील केला होता. मात्र तो न्यायालयाने फेटाळून लावला होता. सोमवारी रात्री उशिरा महात्मा गांधी चौकी पोलिसांनी डॉ. बरफे यास अटक केली आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.