सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी संशोरातल्या श्री गणपतीचे दर्शन घेऊन अमित ठाकरे यांनी आपल्या दौऱ्याचा प्रारंभ केला. शहरात मनसे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून प्रमुख विद्यार्थी प्रतिनिधी यांच्याशी पहिल्यांदा संवाद साधला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर मिरज शहरामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये वैद्यकीय सेलचे उद्घाटन पार पडले. त्यानंतर कुपवाड या ठिकाणी मनसेच्या शाखेचे उद्घाटन देखील अमित ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. कुपवाड येथील मनसेच्या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांचे पुत्र सौरभ शेट्टी यांची पहिल्यांदाच भेट झाली. मनसेच्या कार्यक्रमांमध्ये सौरभ शेट्टींनी उपस्थिती लावत अमित ठाकरे यांची भेट घेतली. सांगलीतील मनसे युवा नेते विनय पाटील यांनी अमित ठाकरे आणि सौरभ शेट्टी यांची ही भेट घडवून आणली.
राजकीय भेट नाही : याबाबत सौरभ शेट्टी म्हणाले, कोणत्याही प्रकारची राजकीय भेट नव्हती. आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळ चालवतो. या चळवळीच्या निमित्ताने मनसेचाही नेहमी पाठिंबा आपल्याला राहिला आहे. कोल्हापूर, सांगली येथील मनसेचे अनेक नेते कार्यकर्ते आपल्या आंदोलनात देखील अनेक वेळा सहभागी झाले आहेत. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ही चळवळ सुरू आहे. हीच गोष्ट अमित ठाकरे यांच्या कानावर मनसेच्या नेत्यांनी घातली होती. त्यानंतर आम्ही ठाकरे यांनी देखील भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आम्ही कुपवाड या ठिकाणी भेटलो, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या अडचणींवर चर्चा : अमित ठाकरे आणि आपल्यामध्ये केवळ विद्यार्थी प्रश्नांबाबत चर्चा पार पडली. ज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीपासून ते कॉलेजपर्यंत जाण्यासाठी बसेसची उपलब्धता, अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे इतरही काही प्रश्न आहेत, या बाबींवर देखील या भेटीदरम्यान चर्चा झाली. आपण देखील या भेटीमध्ये त्यांना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची नेमक्या अडचणी काय आहेत? हे समजून सांगितलेले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी देखील, लढा आणखी वाढवण्याच्या दृष्टीने चर्चा केल्याचे सौरभ शेट्टी यांनी सांगितले आहे.
भेटीमुळे चर्चेचा धुरळा : दरम्यान मनसेच्या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमात अमित ठाकरे यांच्यासोबत स्वाभिमानी राज संघटनेचे युवा नेते सौरभ शेट्टी यांची उपस्थिती, पाहून राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या जात आहेत. भविष्यातल्या मनसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नव्या राजकीय समीकरणाची ही नांदी, तर नाही ना? अशी चर्चा देखील सुरू झाली आहे. पण राज्यातल्या दोन दिग्गज नेत्यांच्या पुत्रांच्या झालेल्या या भेटीमुळे चर्चेचा धुरळा उठला आहे.