सांगली : स्वराज्य रक्षकमध्ये धर्मरक्षण आणि सर्वकाही येत असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले. सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या मणेराजुरी या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते.
आबांच्या आठवणींना उजाळा : विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर.आर.आबा पाटील यांच्या आठवणींना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगलीच्या मनेराजुरी या ठिकाणी उजाळा दिला. यावेळी आबांच्या आठवणी सांगताना तासगावकरांना कानपिचक्याही दिल्या. राज्याचे ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या आबांना नेहमीच तासगावच्या जनतेने कमी मताधिक्याने निवडून दिले. मी माझ्या बारामती मतदारसंघातून लाखांच्या मताने निवडून येतो. गेल्यावेळी तर सांगलीचे पार्सल डिपॉझिट जप्त करून करून पाठवले. अशा शब्दात अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांना नाव न घेता टोला लगावला. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित आर.आर. पाटील असतील असे अप्रत्यक्ष सूचक वक्तव्य देखील अजित पवारांनी यावेळी केले आहे.
अजित पवारांची टीका : राज्यातील सरकार हे स्थगिती सरकार आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दुसरीकडे चिन्ह व नावाबद्दल निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. कोणत्या ठिकाणी आमचा महाराष्ट्र नेऊन ठेवला आहे, अशा शब्दात पवारांनी शिंदे फडणवीस सरकारवर आगपाखड केली. त्याचबरोबर मुदत संपून देखील गेल्या वर्षभरामध्ये जिल्हा परिषद असेल महानगरपालिका, नगरपालिका असेल यांच्या कोणत्याच निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे हा सगळा सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचा भाजपाचा उद्योग असल्याची टीकाही अजित पवारांनी यावेळी केली आहे.
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांची ख्याती आहे. त्यांची पत्नी आणि मुलगा सध्या सांगलीच्या राजकारणात सक्रिय आहेत. या जिल्ह्यातील तसेच तासगाव भागातील सर्वच निवडणुकीमध्ये दोघेही सक्रिय असतात. अलिकडच्या काळात झालेल्या निवडणुकीत आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हिरीरीने सहभाग घेत असल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही त्यांना पाठबळ देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात रोहित पाटील यांच्या आमदारकीच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.