सांगली - अपुरा पाणीपुरवठा आणि पालिका प्रशासनाकडून पाठविण्यात आलेल्या पाणी बिलाच्या निषेधार्थ सांगलीमध्ये शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. शहरातल्या कोल्हापूर रोडवरील पाण्याच्या टाकीवर चढून स्थानिक नागरिकांनी आणि सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी मिळून महापालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले.
पाण्यासाठी पाण्याच्या टाकीवर शोले आंदोलन -
सांगली शहरातल्या उपनगर असणाऱ्या शामरावनगर या भागांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा सुरू आहे. बरोबर पाण्यासाठी मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहेत. गेल्या सहा महिन्यात पाण्याची भरमसाठ बिल स्थानिक नागरिकांना पाठवण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या कारभाराच्या निषेधार्थ अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. कोल्हापूर रोडवरील आकाशवाणीच्या मागे असणाऱ्या महापालिकेच्या पाण्याच्या टाकीवर चढून सत्ताधारी भाजपा नगरसेविका नसीमा नाईक यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी शोले स्टाईल आंदोलन केरण्यात आले. तातडीने नियमित पाणीपुरवठा करावा, वाढीव पाण्याची बिले कमी करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनाची महापौरांनी घेतली दखल -
या आंदोलनाची माहीती मिळताच सांगली महापालिकेच्या महापौर गीता सुतार यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत आंदोलन करणाऱ्या नगरसेविका व नागरिकांची समजूत काढत,लवकरच पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले, यानंतर हे शोले स्टाईल आंदोलन स्थगित करण्यात आले.