सांगली - केंद्र सरकारच्या खत आणि पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आंदोलन करण्यात आले आहे.केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करत तातडीने खतांचा दरवाढ मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
केंद्र सरकारकडून नुकताच देशात खतांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून विरोध करत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 18 मे रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सांगलीमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली शहरातल्या मिरज रोडवरील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
'शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी खतांची दरवाढ'
कोरोनाच्या स्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी संकटात असताना केंद्र सरकारकडून दिवसेंदिवस पेट्रोलची दरवाढ करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी खतांची दरवाढ करण्यात आलेली आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणारी असून केंद्र सरकारने तातडीने ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा यापुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.