सांगली - पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी त्याचबरोबर पूरग्रस्तांना वाढीव मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करत पूरग्रस्तांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी हरिपूर येथे ही मागणी केली आहे.
सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली आहे. अंकली, हरिपूर सांगलीसह जिल्ह्यातील पूर भागात जाऊन आदित्य ठाकरे यांनी पुराचा आढावा घेतला आहे. हरिपूर येथे आदित्य ठाकरे यांनी हळदीच्या पेवांची व नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. हरिपूरमधील पूरग्रस्तांशी संवाद साधताना सांगली जिल्ह्याला महापुरामुळे मोठे नुकसान सर्वच पातळ्यांवर झाला आहे.
शेती त्याचबरोबर सामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूर भागातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. त्याचबरोबर पूरग्रस्तांना वाढीव मदतही मिळाली पाहिजे, अशी आपली मागणी असून मुख्यमंत्री यांच्याकडे ही मागणी आपण करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
तसेच पूरग्रस्तांना आपल्या आरोग्याची सर्वप्रथम काळजी घेतली पाहिजे. आजारपणाची लक्षणे असल्यास तातडीने त्यांच्या भागातील आरोग्य केंद्रात जाऊन औषधोपचार घ्यावे. तसेच पूरग्रस्तांना जर मदत मिळत नसेल, तर त्यांनी शिवसेनेच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी शिवसेनेच्या माध्यमातून ती मदत पोहोचवली जाईल, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले आहे.