सांगली - आई, पत्नी आणि दोन मुलींचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारत इरकर असे या आरोपीचे नाव असून जत तालुक्यातल्या कुडनूरमध्ये ही घटना घडली होती. आर्थिक अडचणीच्या नैराश्यातून इरकर याने हे कृत्य केले होते.
हेही वाचा - पोलिस शिपाई विनायक शिंदेकडे ठाणे आणि नवी मुंबईची वसूली, गोपनीय डायरी आली समोर
आई, पत्नी आणि मुलींचा केला होता खून
जत तालुक्यातल्या कुडनूर या ठिकाणी 10 ऑक्टोबर 2016 रोजी 4 जणांची हत्या झाल्याची घटना घडली होती. आरोपी भारत इरकर (वय 49) याचा आणि त्याची सावत्रआई जनाबाई इरकर यांच्यात शेतजमिनच्या वाटणीचा वाद सुरू होता. हा वाद न्यायालयात सुरू असताना भारत इरकर याच्या बाजूने निकाल लागला होता. मात्र, सावत्रआई जनाबई यांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती, ज्यातून सुनावणी होऊन जनाबाई यांच्या बाजूने निकाल लागला होता. दरम्यान, उच्च न्यायालयातील दाव्यामुळे भारत इरकर याला मोठ्या आर्थिक खर्चाला सामोरे जावे लागले होते.
आर्थिक नैराश्येतून संपवले कुटुंब
आई, पत्नीचा सांभाळ कसा करायचा या नैराशेतून इरकर याने आपली आई सुशीला इरकर, पत्नी सिंधुताई इरकर, मुलगी रुपाली आणि राणी या चौघांचा आपल्या शेतात शस्त्र्यांनी वार करून निर्घृण खून केला होता.
पोलीस ठाण्यामध्ये इरकर विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, या खटल्याची सुनावणी सांगली जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पार पडली. यामध्ये 13 साक्षीदार तपासण्यात आले. सबळ पुराव्याच्या आधारे भारत इरकर याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे काम सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी पाहिले तर या गुन्ह्याचा तपास जतचे तत्कालीन पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी केला होता.
हेही वाचा - एजाज खानला 3 एप्रिलपर्यंत कोठडी, एजाज म्हणाला- झोपेच्या फक्त ४ गोळ्या सापडल्या