सांगली - लुटमार करत दोन महिलांचा खून केल्याप्रकरणी एका आरोपीला सांगली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शबऱ्या उर्फ सुनील पवार असे या आरोपीचे नाव आहे. मिरज तालुक्यातील बेळंकी येथे यात्रे दरम्यान पवार याने महिलांना लुटत दोघींचा खून केला होता.
हेही वाचा - VIDEO : अन् 'तिने' शिकवला छेड काढणाऱ्यास चांगलाच धडा
मिरज तालुक्यातील बेळंकी येथे महिलांची लुटमार करुन दोन महिलांचा खून करण्यात आला होता. यावेळी त्याने सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी आरोपी सुनील पवार याला सांगली जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 11 डिसेंबर 2014 ला बेळंकी येथे यल्लमा देवीची यात्रा होती. त्यावेळी घरी परतत असताना शकुंतला गायकवाड, सुनिता गायकवाड आणि दिपाली गायकवाड यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटत शकुंतला आणि सुनिता गायकवाड या दोघींचा चाकूने भोसकून खून केला होता.
याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दरोड, खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी मिरज पोलिसांनी सुनील पवार याला अटक केली होती. या खटल्याची अंतिम सुनावणी सांगली जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली. या प्रकरणी सरकारी पक्षाकडून 15 साक्षीदार तपासण्यात आले होते. या साक्ष पुराव्याच्या आधारे न्यायालयाने पवार याला दोषी ठरवत, सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.