जत (सांगली) - तालुक्यातील संखजवळ महिंद्रा पिकअप गाडीचा (एमएच 04-जीसी-1648) भीषण अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अनिलकुमार शिंवलिंगा मुडेगोळ (वय 30) राहणार बिळूर असे मृताचे नाव आहे.
जत तालुक्यातील बिळूर ते तिंकुडी येथे द्राक्षे आणण्यासाठी जात असताना संखपासून 2 किलोमीटर अंतरावर ईसार पेट्रोल पंपाजवळ गुडापूर रस्त्यावर अपघात झाला. बोलेरो पिकअप भरधाव जात असताना चालकाचा ताबा सुटल्यामुळे पलटी झाले. वाहनातील तिघांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. मृताच्या डोक्याला जबर मार लागल्याने अतिशय रक्तस्राव झाल्यामुळे तो मृत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
अपघातील मृत, वाहन चालक राजू कलाप्पा कायपुरे (वय 30) आणि द्राक्ष व्यापारी राजू चाँदसाब व्हनवाड (वय 36) तिघे राहणार बिळूरचे आहेत. अपघातानंतर घटनास्थळावरून 108 रुग्णवाहिकेला फोन करण्यात आला होता. पण, रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. घटनास्थळी उमदी पोलिसांनी धाव घेत जागेवर पंचनामा करून शवविच्छेदनासाठी उमदी येथे मृतदेह नेण्यात आला. उमदी पोलीस ठाण्यामध्ये उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.