सांगली - काजू-बदाम खाणारा बोकड ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मिरजेतील सुभाषनगर येथील 'सुलतान बोकड'ला रोज काजू-बदामची खुराक लागते. विशेष म्हणजे, सुलतानला 20 लाखांपर्यंत मागणी झाली आहे. डोक्यावर चंद्रकोर असल्याने सुलतानचा भाव वधारला आहे. याचे पालनही अगदी शाही बडदास्त प्रमाणे आहे.
सुलतान, पैलवान नव्हे तर बोकड..
सोनू शेट्टी या तरुणीने या सुलतानला पाळले आहे. शेट्टी कुटुंबाकडून अगदी घरच्या सदस्याप्रमाणे त्याचा सांभाळ करण्यात येतो. शेट्टी कुटुंबाचे घरगुती शेळी पालनाचा व्यवसाय आहे. यापैकी एका शेळीने सुलतानला जन्म दिला.
रोज लागते काजू-बदमाची खुराक..
सुलतानचे पालन-पोषण इतर शेळी-बोकडांप्रमाणे नसून खास पद्धतीने केले जाते. रोज सकाळी उठल्यानंतर सोनू या सुलतानला स्वच्छ करून त्याचे केस विचरून घेते. त्याला रोज वेळेत आहार दिला जातो, मात्र यात विशेष म्हणजे काजू आणि बदामची खुराक असते आणि काही क्षणात सुलतान काजू-बदाम फस्त करतो. या शिवाय आठवड्यातून एकदा डॉक्टर सुलतानची आरोग्य तपासणी करतात.
20 लाखांपर्यंत लागली आहे बोली..
काजू - बदाम आणि योग्य आहार, यामुळे सुलतानची शरीरयष्टी भारदास्त बनली आहे. त्याचे वजन सध्या 70 किलोच्या आसपास आहे. सुलतान दिसायला देखणा आहे. परिणामी, सुलतानची किंमतही वधारली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल वीस लाखांपर्यंत सुलतानला मागणी झाली आहे. अगदी गोवा, कोलकत्ता येथून देखील सुलतानला मागणी आली आहे.
सुलतानच्या कपाळावर चंद्र..!
सुलतानच्या कपाळावर चंद्रकोर आहे. मुस्लीम धर्मियांमध्ये बकरी ईदला अशा बोकडाला अधिक मागणी असते. सध्या बकरी ईद जवळ आली आहे. त्यामुळे, सुलतानची मागणी वाढली आहे. तर, सुलतानच्या मालकीण सोनू शेट्टी म्हणाल्या, आतापर्यंत वीस लाखांपर्यंत 'सुलतान'ला मागणी आली आहे. मात्र 30 ते 40 लाखांपर्यंत किंमत आली तरच आपण सुलतानची विक्री करणार आहे, तोपर्यंत सुलतानचे पालन पोषण असेच राहील.