सांगली - कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात बुधवारपासून 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनची अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा- क्रिकेटर वेदा कृष्णमूर्तीबरोबर नियतीचा क्रूर खेळ; आईनंतर बहिणीचा कोरोनाने मृत्यू
लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू
सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यात 5 मे पासून आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून त्याची कडक अंमलबजावणी सुरू झालेली आहे. या लॉकडाऊनमध्ये केवळ दूध विक्री 7 ते 9 या वेळेत घरपोच सुरू असणार आहे, त्या व्यतिरिक्त कोणत्याही आस्थापनांना परवानगी नसणार आहे, एसटी सेवासुद्धा बंद ठेवण्यात आली आहे. केवळ वैद्यकीय सेवा या काळात सुरू असणार आहे.
हेही वाचा - 'सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे केलेले कौतुक ही विरोधकांना चपराक'
उल्लंघन केल्यास कडक कारवाई
या लॉकडाऊनची पोलीस प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात रस्त्यावर आता फक्त पोलिसांचा कडा पहारा आणि गस्त सुरू झालेली आहे. गुरुवारी सकाळी सांगली शहरातल्या सर्व बाजारपेठांमध्ये सामसूम अशी परिस्थिती होती. भाजीपाला विक्री खरेदीसाठी होणारी गर्दी ही आता बंद झालेली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ये-जा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 13 मे पर्यंत हा कडक लॉक़डाऊन जिल्ह्यात लागू असणार असून याचे पालन जनतेने करावे, असे आवाहन करत जे याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.