सांगली - शहरात ५ ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यात ५ फ्लॅट फोडून २० तोळे दागिन्यांसह रोख ५० हजार, असा एकूण ७ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. या चोऱ्या विश्रामबाग परिसरात झाल्या आहेत.
विश्रामबाग येथील नागराज कॉलनी आणि एसटी कॉलनीतील दोन अपार्टमेंटमध्ये पाच घरफोड्या झाल्या आहेत. भरदिवसा एकाच वेळी या चोऱ्या करण्यात आल्या आहेत. नागराज कॉलनीतील चैतन्यकृपा अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक ४ मध्ये राहणारे दत्ता रावसाहेब पवार यांच्या बंद फ्लॅटधून तीन तोळ्याचे गंठण, फ्लॅट क्रमांक १० मध्ये राहणाऱ्या सुनील ठोकळे याच्या फ्लॅटमधून ५ तोळ्यांचे मंगळसूत्र, चांदीच्या मूर्ती, चांदीचे शिक्के आणि रोख ९ हजार लंपास केले. तर कृष्णा कुलकर्णी यांच्या फ्लॅटमधून चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.
एसटी कॉलनीतील सरस्वती अपार्टमेंटमध्ये यावेळी २ फ्लॅट फोडण्यात आले. त्यातील प्रसाद चिंतामणी दत्ता यांच्या फ्लॅटमधून दीड तोळ्याचे मंगळसूत्र, ६ ग्रॅमची कर्णफुले, ४ ग्रॅमच्या रींग, असे २ तोळ्याचे दागिने व दहा हजार रूपये रोख असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. त्याच अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २मध्ये राहणाऱ्या मकरंद कुलकर्णी यांच्या फ्लॅटमधून चांदीची मूर्ती, एक तोळ्याच्या ३ अंगठ्या, दोन तोळ्याचे कडे, ३ तोळ्याचे कर्णफुले, असे ८ तोळे दागिने आणि २५ हजार रोख लंपास करण्यात आले आहेत. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.