मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मुंबई शहर आणि जिल्ह्यात मतदान पार पडल्यानंतर आता, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आलंय. प्रत्येक मतमोजणी केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेनं दिली.
मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक : "मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यातील मिळून एकूण 36 मतदारसंघांसाठी 36 केंद्रांवर शनिवारी 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. प्रत्यक्ष मतमोजणी करण्यासाठी सुमारे 2 हजार 700 हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर, सुमारे 10 हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत," अशी माहिती पालिकेनं दिली.
आयुक्त भूषण गागरणी यांच्याकडं जबाबदारी : निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, प्रथमच मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा निवडणूक अधिकारी पदाची संयुक्तपणे जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गागरणी यांच्याकडं सोपविण्यात आली आहे. त्यांच्या देखरेखीखाली मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यातील एकूण 36 मतदारसंघांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली.
स्ट्राँग रुममध्ये कडेकोट बंदोबस्त : "मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम आणि व्हिव्हीपॅट मशीन संबंधित मतदारसंघांच्या स्ट्राँग रुममध्ये अतिशय कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. एकूण 36 स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ, राज्य राखीव पोलीस दल तसेच मुंबई पोलीस तैनात आहेत. हे सर्व स्ट्राँग रुम सीसीटीव्ही निगराणीखाली आहेत," अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली.
अशी आहे मतमोजणीची प्रक्रिया : पालिकेच्या माहितीनुसार, "मुंबईतील एकूण 36 मतदारसंघांसाठी 36 केंद्रांवर शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. सुरुवातीला टपाली मतांची मोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी केली जाईल. प्रत्यक्ष मतमोजणी करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघानुसार, निवडणूक निर्णय अधिकारी, पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, सूक्ष्म निरीक्षक, सहायक कर्मचारी आदी मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आल्याचं पालिकेनं म्हटलं आहे."
कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सुविधा : "पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे मिळून एकूण 10 हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी मतमोजणी केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, मतमोजणी प्रक्रियेत सहभागी कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत," अशी माहिती पालिकेने दिली.
हेही वाचा -