सांगली - लॉकडाऊनमुळे सांगलीमध्ये अडकलेल्या तामिळनाडुतील ४८० कामगारांना घेवून एस.टी महामंडळाच्या १६ बसेस शुक्रवारी रात्री रवाना झाल्या आहेत. महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाला धन्यवाद देत, त्यांनी गावाकडे परतीचा प्रवास सुरू केला. दूरचा प्रवास असल्याने प्रशासनाने या सर्वाना खाण्यासाठी टिकाऊ अन्नपदार्थ व पाण्याच्या बाटल्या देवून प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
सांगलीमध्ये लॉकडाऊनमुळे तामिळनाडू येथील सुमारे ४८० जण अडकले होते. सांगली-कुपवाड एमआयडीसीमध्ये विविध ठिकाणी हे कामगार काम करत होते. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आप-आपल्या गावी जाण्यासाठी या कामगारांना एकत्र येऊन पायी जाण्याचा निर्धार करत प्रवास सुरू केला होता. मात्र, प्रशासनाने या सर्वांना रोखत, त्यांना धीर देत घाबरून जाऊ नये, ज्या ठिकाणी राहता तिथे परत जावे, लॉकडाऊनमध्ये जेवण खाण्या पिण्याच्या सर्व व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे गेल्या सव्वा महिन्यापासून जिल्हा व पालिका प्रशासनाकडून आजपर्यत त्यांचे जेवणाची सोय केली होती.
त्यानतंर केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार परप्रांतीय कामगारांना परत पाठवण्याच्या निर्देशानुसार सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी प्रयत्न केल्यामुळे सदर व्यक्तींना तामिळनाडूच्या सेलम या त्यांच्या गावी जाण्याची परवानगी मिळाली. त्यानुसार शुक्रवारी रात्री अडकलेले ४८० परप्रांतीय कामगार हे महाराष्ट्र शासनाच्या विशेष १६ एसटी बसेसमधून कुपवाड येथून रवाना झाले आहेत. यापूर्वी या सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी करून ते कोव्हिड सदृष्य आजारी नसल्याची तपासणी करण्यात आली. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत जेवण घालून व पुरेसे अन्न देऊन त्या कामगारांना रवाना केले. यावेळी आपल्या घरी परतणाऱया परप्रांतीय कामगारांनी महाराष्ट्र शासन आणि सांगली जिल्हा प्रशासनासह विविध यंत्रणांचे आभार मानले.