सांगली - कोरोनाचा फटका सांगलीतल्या एसटीलाही मोठया प्रमाणात बसला आहे. गेल्या २ दिवसांपासून एसटीकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने एसटीच्या ४३२ फेऱ्या रद्द झाल्या असून आत्तापर्यंत लाखो रुपयांचा फटका सांगलीच्या एसटी महामंडळाला बसला आहे. तर, प्रवाशी अभावी सांगलीचे बसस्थानकदेखील सामसूम पडले असून प्रवाश्यांनी पाठ फिरवल्याने दोन दिवसात २२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका अनेक स्तरावर बसत आहे. सांगलीच्या एसटी विभागालाही गेल्या २ दिवसात याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. कोरोनाच्या भीतीने प्रवाशांनी प्रवास करणे टाळले आहे. परिणामी, सांगली आगाराचे २ दिवसात २२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर एसटी आगाराकडून राज्यातील अनेक मार्गावरील एसटी वाहतूक सेवा रद्द करण्यात आली आहे. शहरातील १५६ बस फेऱ्या तर, ग्रामीण आणि जिल्ह्याबाहेरील अशा एकूण ४३२ फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती सांगली एसटी विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली आहे.
हेही वाचा - कोरोनाचा कहर; 31 मार्चपर्यंत सर्व शाळा,मॉल्स,चित्रपटगृह राहणार बंद
तर, कोरोनाच्या भीतीने प्रवाशांनी प्रवास करण्याचे टाळल्याने बस स्थानकात प्रवाशांची तुरळक गर्दी दिसत असून बस स्थानक सामसूम पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कर्नाटक राज्यातून येणाऱ्या बस फेऱ्यासुद्धा कमी झाल्या आहेत. अशीच परिस्थिती आणखी काही काळ राहिल्यास एसटी विभागाला कोट्यवधी रुपयांची फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली प्रशासन 'अलर्ट', प्रतिबंधासाठी उभारली 'वॉर रूम'