सांगली - बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा सांगली पोलिसांनी पर्दाफाश केला. दोन हजार रुपयाच्या बनावट नोटा बनवून खपवणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. यावेळी ९० हजार किंमतीच्या 2 हजार व 200 रुपयाच्या बनावट नोटांसह 1 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
पोलिसांनी 2 हजारच्या 45 आणि, 200 रुपयाच्या 4 नोट जप्त केल्या आहेत. तसेच नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे 20 हजाराचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी विजय कोळी, शरद हेगडे आणि तेजस गोरे याला अटक करण्यात आली आहे.
बनावट नोटा खपवताना रंगेहाथ पकडले
कुपवाड शहरतील दत्तनगर या ठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगार विजय कोळी व त्याचा मित्र बनावट नोटा खपवण्यासाठी थांबले आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलीस पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे 2 हजाराच्या 39 व 200 रुपयाची 1 अशी हुबेहूब बनावट नोट आढळली. याबाबत चौकशी केली असता, या बनावट नोटा असल्याची कबुली दोघांनी दिली. तर, विजय कोळी याने सांगितले की, शरद हेगडे याने आपल्याला या बनावट नोटा खपवण्यासाठी दिल्या आहेत आणि आम्ही दोघे त्या खपवत होतो. त्यानंतर पोलिसांनी हेगडे याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील मोरोची येथील नातेवाईक तेजस गोरे याच्या घरात बनावट नोटा छापण्यात येत असल्याची माहिती दिली.
हेही वाचा - भंडारा दुर्घटनेची सरकारकडून गंभीर दखल - पालकमंत्री विश्वजीत कदम
बनावट नोटांच्या अड्ड्यावर छापा
ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील शरद हेगडे याचा नातेवाईक तेजस कोरडे याच्या माळशिरस तालुक्यातल्या मोरोची या गावातील घरावर छापा टाकला. या ठिकाणी बनावट नोटा तयार करण्यात येत असल्याचे समोर आले. यावेळी 10 हजाराचा 1 कलर प्रिंटर, 8 हजार किंमतीचा एलसीडी स्क्रीन, 3 हजार किंमतीचा कलर स्कॅनर आणि 2 हजाराच्या 6 व 200 रुपयाच्या 3 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या व तेजस गोरेला अटक करण्यात आली.
...अशा प्रकारे बनत होत्या बनावट नोटा
आधी खऱ्या नोटांचा मोबाईलवर फोटो काढण्यात येत होता. त्यांनतर कॉम्प्युटरमधील फोटोशॉपमध्ये तो एडिट केला जात असे. त्यानंतर कलर इंजेक्टमधून झेरॉक्स पेपरवर मागे पुढे प्रिंटिंग केली जायची. त्यानंतर त्याची कटींग व्हायची, अशा पद्धतीने या बनावट नोटा घरात छापण्यात येत होत्या.
मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात
या टोळीकडून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा छापून त्या बाजारात खपवण्यात आल्याचा संशय असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली. तसेच, नागरिकांनी बनावट नोटांपासून सावध राहावे, असे त्यांनी आवाहन केले.
हेही वाचा - राज्यात यापुढे अनधिकृत बांधकाम खपवून घेतला जाणार - एकनाथ शिंदे