सांगली- महापुराचा फटका सांगली महापालिकेला सुद्धा बसला आहे. महापुरामुळे सांगली महापालिकेच्या तब्बल 200 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पालिकेचे कार्यालय, रस्ते अशा अनेक गोष्टी या महापुरामुळे बाधित झाल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे. तसेच शासनाकडे नुकसान भरपाई करण्याची मागणीही करण्यात येणार असल्याचे आयुक्त कापडणीस यांनी स्पष्ट केले आहे.
सांगलीच्या महापुरात महापालिका कार्यालय तब्बल पाच ते सहा दिवस पुराच्या पाण्यात अडकले होते. त्याचबरोबर महापालिकेचे अग्निशमन विभाग त्याचे इतर कार्यालय सुद्धा या पुराच्या पाण्यात होते. त्यामुळे महानगरपालिकेच्या इमारतीमधील फर्निचर, संगणक, जनरेटर तसेच अन्य साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर सांगली आणि मिरजेत पूरग्रस्त भागात नव्याने केलेले सर्व रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या सर्व नुकसानीचा अहवाल पालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. या नुकसान भरपाईची शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती सांगली महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे.