सांगली - आरोग्याच्या चौकशीसाठी गेलेल्या एका परिचारिकेस दोघा भावांनी चाबकाने मारहाण केल्याची घटना जत तालुक्यातील येळवी येथे घडली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या दोघा भावांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्याचा सर्वे करण्यात येत आहे.अशाच पद्धतीने जत तालुक्यातील येळवी याठिकाणी बाहेरून आलेल्या एका महिलेच्या आरोग्य तपासणीसाठी गेलेल्या एका परिचारिकेस चाबकाचे फटके देऊन मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमोर शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.
'आईचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल दाखवा, स्वॅब घेण्यासाठी घरी येणार असल्याने आमची बदनामी झाली' असा आरोप करत धनाजी घोंगडे व बाळू घोंगडे या दोघांनी शिवीगाळ करत चाबकाने ही मारहाण केली. त्यानंतर विभुते यांनी जत पोलrस ठाण्यात फिर्याद दिली असून, या प्रकरणी पोलिसांनी धनाजी घोंगडे व बाळू घोंगडे या दोघा भावांवर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.