सांगली - हज यात्रेसाठी सांगलीतून आज (सोमवार) 135 यात्रेकरू रवाना झाले आहेत. यात्रेकरूंची सांगलीतून मुंबईपर्यंत खिदमत हुज्जाज कमिटीकडून रवानगी करण्यात आली आहे. यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नातेवाईक उपस्थित होते.
मुस्लिम धर्मियांचे पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या सौदी अरेबियातील मक्का येथील हज यात्रेसाठी आज सांगलीतून यात्रेकरू रवाना झाले आहेत. यंदाच्या वर्षी हज कमिटी महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून 314 आणि इतर असे एकूण 400 हज यात्रेकरू सांगली जिल्ह्यातून जात आहेत. यातील आज 145 यात्रेकरू हज यात्रेसाठी रवाना झाले आहेत. मंगळवारी सकाळी अकरा वाजता विशेष विमानाने सौदी अरेबियाकडे ते रवाना होणार आहेत, तर मंगळवारी रात्री आणखी 90 यात्रेकरू विशेष बसमधून सांगलीतून हजसाठी रवाना होणार आहेत.
यंदा मुंबई येथील हज कमिटीमध्ये न थांबता यात्रेकरू थेट मुंबई एअरपोर्टवरून सौदी अरेबियाकडे प्रस्थान करणार आहेत. मुंबईपर्यंत सर्व यात्रेकरूंना पोहचवण्यासाठी योग्य नियोजन आणि विशेष बसची सांगली जिल्हा खिदमत हुज्जाज कमिटीकडून व्यवस्था करण्यात आली आहे. आज दुपारी कोल्हापूर रोडवरील रमजान मस्जिद येथून सामूहिक प्रार्थनेनंतर, भारताचा तिरंगा ध्वज फडकवून यात्रेकरूंची बस रवाना करण्यात आली. यावेळी यात्रेकरूंना निरोप आणि शुभेच्छा देण्यासाठी नातेवाईक तसेच विविध सामाजिक क्षेत्रातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 45 दिवस असणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य हज कमिटी आणि सांगली जिल्हा खिदमत हुज्जाज कमिटीकडून यात्रेकरुंना विशेष मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात आले आहे.