सांगली - मुंबईहून सेवा करून परतलेल्या सांगली जिल्ह्यातील 106 एसटीच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये चालक, वाहकांचा समावेश आहे. बेस्ट सेवेसाठी सांगली विभागातून हे कर्मचारी मुंबईला गेले होते.
106 कर्मचाऱ्यांना कोरोना
मुंबईमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा बंद असल्याने प्रवासी सेवा देण्यासाठी बेस्टच्या मदतीला सांगली जिल्ह्यातूनही एसटी बसेस पाठवण्यात आल्या होत्या. सांगली आगारातून 13 ऑक्टोबर रोजी सुमारे 200 गाड्या या मुंबईत प्रवासी वाहतुकीसाठी पाठवण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील 9 एसटी आगारातून 100 चालक, 200 वाहक आणि इतर 25 असे एकूण 425 कर्मचारी मुंबईला पाठवण्यात आले होते. 10 दिवसांची सेवा करून परतल्यानंतर सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती, तेव्हा तब्बल 106 चालक आणि वाहकांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहेत. त्यामुळे सांगली एसटी प्रशासन हादरून गेले आहे.
९ डेपोतील कर्मचारी
जिल्ह्यातील 9 डेपोतील हे कर्मचारी आहेत. ज्यामध्ये सांगली डेपोचे 6, मिरज 6, आटपाडी 15, जत 15, कवठेमहांकाळ 14, इस्लामपूर 6, विटा 14 , तासगाव 24 आणि शिराळा आगार मधील 6 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर काही कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर काही जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
राज्यातील कोरोना अपडेट
राज्यात आज 3 हजार 645 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकूण बाधितांचा आकडा 16 लाख 48 हजार 665 वर पोहोचला आहे. आज 84 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असून आजपर्यंतर 43 हजार 348 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.2 टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या राज्यात 1 लाख 34 हजार 137 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.