रत्नागिरी- रत्नागिरीतल्या भाट्ये समुद्रकिनारी असलेल्या खडकात आज एका तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मात्र, ही आत्महत्या आहे की घातपात? याबाबत उलगडा झाला नसून याप्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
भाट्ये समुद्रकिनारी बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉक करता गेलेल्या लोकांना समुद्रकिनारी खडकात विचित्र आवाज ऐकू येत होता. सुरुवातीला एखादे श्वापद ओरडत असावे असा संशय आल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतरही आवाज येत होता. त्यानंतर काहीजण हा प्रकार नेमका काय आहे हे पाहण्यासाठी पुढे गेले. पुढे गेल्यावर मात्र त्यांना धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. एक तरुण जळालेल्या स्थितीत वेदनेने विव्हळत होता. हा प्रकार पाहून तत्काळ शहर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. मात्र, घटनास्थळी पोलीस पोहोचेपर्यंत त्या तरुणाचा मृत्यू झाला होता.
या तरुणाकडे असलेल्या मोबाईलवर कॉल आले होते. त्यातील एका नंबरवर पोलिसांनी कॉल केला असता, त्याच्या घरच्यांना कॉल लागला आणि तरुणाची ओळख पटली. तुषार बाळकृष्ण चौधरी (वय. २५, रा. बोर्डिंग रोड) असे या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, तुषार याची आई प्रादेशिक मनोरुग्णालयात कामाला असल्याने त्यांची सकाळी ५ ची ड्युटी होती. त्यामुळे त्यांना कामावर सोडण्यासाठी तुषार सकाळी दुचाकी घेऊन बाहेर पडला होता. मात्र, तो वेळीच घरी न आल्याने त्याच्या घरच्यांनी त्याला मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फोन उचलत नव्हता.
पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर याबाबतची माहिती त्याच्या घरच्यांना मिळाली आणि तुषारचा भाऊ आणि इतर नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. समोरील धक्कादायक प्रकार पाहून त्याच्या घरच्यांनी एकच आक्रोश केला. ही आत्महत्या की घातपात याबाबतचा उलगडा अद्याप झालेला नाही. दरम्यान घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. याची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.