रत्नागिरी - संचारबंदीत तो गावातच अडकला, पण या काळात त्याने मेहनतीसोबत जिद्द सोडलेली नाही. ही जिद्द आहे लष्करात भरती होण्याची.. सूचय मोरे असे या जिद्दी तरुणाचे नाव आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावचा हा तरुण आपल्या पाठीला 12 किलोचा टायर बांधून संचारबंदीचे सर्व नियम पाळून जवळच्या जंगलामध्ये रोज असा सराव करतो. त्याला पूर्ण करायचे आहे सैन्यात जाण्याचे स्वप्न.
लहानपणापासूनच सूचयची लष्करात जाण्याची ईच्छा आहे. बारावीपर्यंतचे शिक्षण येथील एस. एन. कानडे हायस्कूलमध्ये झाले. सध्या सूचय डोंबिवलीत राहतो. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे तो परेलला नाईट कॉलेजमध्ये शिक्षण घेउन दिवसा कँटरिंगमध्ये कामाला जातो. सुट्टीच्या दिवशी कल्याण येथील श्री करिअर अॅकॅडमीमध्ये लष्करी प्रशिक्षणासाठी जातो. तर नित्याची कामे आणि शिक्षण यामधून वेळ काढून दर शनिवारी विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयाच्या प्रांगणात ३ महाराष्ट्र बटालियन मुंबईच्या माध्यमातून सुरु असलेले रायफल प्रशिक्षण, परेड यासह लष्करातील विविध चित्तथरारक कसरतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी जातो.
लष्करात जाण्यासाठी सूचयची ही अंगमेहनत तब्बल दीड वर्षापासून सुरू आहे. वयाच्या पंधराव्या वर्षापासून तो लष्करात जाण्याची इच्छा बाळगून आहे. सूचय हा शिमग्याच्या निमित्ताने गावी आला होता. गावचे घर फक्त सणासुदीला उघडले जाते. पाडव्याची गुढी उभी करुन तो पुन्हा मुंबईत जाणार होता. पण अचानक कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीची घोषणा झाली, अन् तो गावीच अडकून पडला. आई-वडील आणि दोघेही भाऊ मुंबईत असल्यामुळे शेजारी असलेले नातेवाईक अमेय नसरे यांच्याकडेच सूचय गेले काही दिवसापासून राहत आहे. पण अशाही परिस्थितीत त्याने आपले ध्येय गाठण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. सकाळी तीन किलोमीटर आणि संध्याकाळी 3 किलोमीटर तो रनिंग करतो. पाठीला 12 किलोचा टायर बांधून तो रनिंग करणे, बैठका मारणे असा त्याचा सराव सुरू आहे. संचारबंदीचे सर्व नियम पाळून आपण ही सर्व मेहनत घेत असल्याचे सूचय सांगतो.
या संचारबंदीत अनेकांच्या पुढे काय करायचे ? हा प्रश्न आहे. पण सूचय हा गावी अडकलेल्या सर्वच तरुणांसाठी प्रेरणादायक ठरला आहे.