रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गावर प्रवासादरम्यान एका महिलेने कन्येला जन्म दिला आहे. सायरा आलम असे या महिलेचे नाव आहे. कोकण रेल्वे मार्गावरुन जाणाऱ्या वास्को ते पटना गाडीने सायरा प्रवास करत होत्या. त्यावेळी ही घटना घडली.
प्रवाशांच्या सेवेसाठी नियुक्त असणारे तिकीट तपासनीस महेश पेंडसे आपल्या देखरेखीखालील डब्यांमध्ये राऊंड मारत होते. यावेळी बी २ डब्यात त्यांना एका महिलेच्या विव्हळण्याचा आवाज आला. सदर महिला गर्भवती असल्याने त्यांनी प्रवाशाच्या मदतीने ओळखीच्या महिलेला बोलावले. गर्भवती महिलेच्या वेदना प्रसुतीच्या असल्याने धावाधाव करत सहप्रवासी महिलेने मोठ्या धाडसाने या गर्भवतीची प्रसुती केली आणि त्या महिलेला कन्यारत्न प्राप्त झाले.
कोकण रेल्वेचे कर्तव्यदक्ष टी सी महेश पेंडसे आणि प्रवासी महिला श्वेता सिंग यांच्या प्रसंगावधानामुळे या गर्भवती महिलेची कोकण रेल्वेतच सुखरुप प्रसुती झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून धावपळ करत आवश्यक साहित्याची जमवाजमव करत श्वेता सिंग यांनी अत्यंत धाडसाने सायरा आलम यांची रेल्वेतच सुखरुप प्रसुती केली. मात्र, सायराला वेळीच वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे होते. टीसी महेश पेंडसे यांनी कोकण रेल्वे कंट्रोल रुमला या परिस्थितीची कल्पना दिली.
हेही वाचा - उद्धव ठाकरेंसोबत १५ वर्षानंतर भेट झाली, आमदार भास्कर जाधव यांचा खुलासा
कंट्रोल रुमने चिपळूण येथे सर्व व्यवस्था उपलब्ध ठेवत असल्याचे पेंडसे यांना कळवले. चिपळूण रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्तर माधवी गांगण, आरोग्य कर्मचारी, रेल्वे पोलीस आणि रुग्णवाहिका तत्पर होते. रेल्वे चिपळूणला पोहचल्यानंतर नेहमी पेक्षा अधिक वेळ थांबवून सायराला बाळासह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.