रत्नागिरी - अवघ्या देशाचे लक्ष 23 तारखेकडे लागले आहे. जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश म्हणजे भारत.. आणि याच लोकशाहीचा महाउत्सव गेले 2 महिने सुरू आहे. या महाउत्सवाची सांगता 23 मे रोजी निकालातून होणार आहे. त्यामुळे पुन्हा मोदी की विरोधी पक्षांच्या एकजूटीला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातही काटे की टक्कर पहायला मिळणार आहे. येथे विनायक राऊत आणि निलेश राणे यांच्या प्रामुख्याने लढत पाहायला मिळाली होती. त्यामुळे या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान खासदार विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून रिंगणात असलेले माजी खासदार निलेश राणे यांच्यात प्रमुख लढत होती. तर सुरुवातीला चर्चेत असलेले काँग्रेसचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर नंतर मात्र मागे पडल्याचे चित्र होते. त्यामुळे संपूर्ण प्रचारात राणे विरुद्ध शिवसेना असेच चित्र पाहायला मिळत होते. त्यामुळे विनायक राऊत यांना पुन्हा संधी मिळणार की निलेश राणे पुन्हा एकदा लोकसभेत जाणार याचीच चर्चा गेले महिनाभर दोन्ही जिल्ह्यात सुरू आहे. राणे की राऊत या दोन नावांवरच गावागावात उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झाले. येथे यंदा 61.69 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 4 टक्क्यांनी घटला होता. पण गेल्या वेळी जवळपास 1 लाख नवीन मतदार होते. त्यामुळे नवमतदारांचा कौलही महत्वाचा असणार आहे.
राज्यातील प्रमुख राजकीय लढतीपैकी एक म्हणून या लढतीकडे पाहिले जात आहे. येथे शिवसेना आणि नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हे दोघेही एनडीएतील घटकपक्ष आहेत. देशात हे एकमेव उदाहरण होते जिथे एनडीएचेच घटकपक्ष या निवडणुकीत आमने सामने होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत हे जवळपास दीड लाख मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा या निवडणुकीत राणे - राऊत आमनेसामने होते, पण यावेळी निलेश राणे यांनी कडवी टक्कर दिली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या प्रचाराची संपूर्ण धुरा खासदार नारायण राणे यांच्यावरच होती, तर विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती. दोन्ही जिल्ह्यात सभा घेत त्यांनी राणेंवर शाब्दिक प्रहार केले होते.
राणे आणि शिवसेनेचे हाडवैर उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. राणेंना नामोहरम करण्याची एकही संधी शिवसेनेने सोडली नाही. मग ती गेल्यावेळची लोकसभा निवडणूक असो किंवा त्यानंतर झालेली विधानसभा निवडणुक असो. शिवसेनेने या निवडणुकांमध्ये राणेंना पराभवाची चव चाखायला लावली.
मात्र राणेंनीही उमेद न हारता स्वतःच्या महत्वकांक्षाना काही प्रमाणात मुरड घालत काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन करत आपला दबदबा सुरूच ठेवला. भाजपने त्यांना आपल्या कोट्यातून राज्यसभेवरही पाठवले, पण त्यांचा पक्ष जरी एनडीएसोबत असला तरी त्यांची भूमिका मात्र स्वतंत्र होती. म्हणूनच युती झाली तरी राणे शिवसेनेच्याविरोधात लढण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि प्रचारात त्यांनी शिवसेनेविरोधात रान उठवले. तसेच इतर पक्षाच्या नाराज मंडळींना आपल्याकडे वळविण्यात त्यांना यश आले आहे. म्हणूनच 50 ते 60 हजार मताधिक्याने निलेश राणे यांचा विजय होईल असा अंदाज राणेंनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राऊत यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे या मतदारसंघात 6 पैकी 5 आमदार शिवसेनेचे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या सर्वच आमदारांना आपापल्या मतदारसंघातून मताधिक्य देणे आवश्यक होते. त्यामुळेच विनायक राऊत दीड लाख मतधिक्याने विजयी होतील असा विश्वास शिवसेनेला आहे. त्यामुळे नेमके काय घडेल ते 23 मे लाच स्पष्ट होईल.
निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे -
- गेल्या वेळी मोदी लाट, यावेळी मोदी लाट नव्हती
- महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या निलेश राणेंची यावेळी कडवी झुंज
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निलेश राणे यांना तर रत्नागिरीतून विनायक राऊत यांना मताधिक्य (लीड) मिळण्याची शक्यता
- सिंधुदुर्गतील मताधिक्यावर राणेंची मदार
- सावंतवाडी आणि कुडाळमध्ये राणेंचा लागला कस
- भाजपची नाराजी राणेंच्या पथ्यावर पडणार?
- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मते वळविण्यात राणेंना यश
- मनसेचा राणेंना पाठिंबा
- भाजपच्या बड्या नेत्यांनी मतदारसंघात फिरवलेली पाठ चर्चेचा विषय
- स्वाभिमानचा जिल्हाध्यक्ष फोडण्यात शिवसेनेला यश
- दोन्ही उमेदवारांना विजयाचा विश्वास
- कुणबी आणि दलित मते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला गेल्याने शिवसेनेला बसू शकतो फटका