रत्नागिरी- अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात जे आहे तेच होईल आणि लवकरच आपण अंतिम वर्षांच्या परीक्षेसंदर्भात बोलणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या हिताचाच हा निर्णय असला पाहिजे ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी भूमिका असल्याची माहिती उदय सामंत यांनी व्हिडिओ संदेशद्वारे दिली आहे.
याबाबत बोलताना सामंत यांनी म्हटलं आहे की, अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. माननीय राज्यपाल महोदयांनी लिहिलेल्या पत्रामुळे देखील संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे. तो हिताचाच निर्णय विद्यार्थ्यांसाठी असला पाहिजे, ही भूमिका महाराष्ट्र शासनाची आहे. मी देखील त्याच भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेबाबत जे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे तोच निर्णय होईल, त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.