रत्नागिरी - सोशल मीडियावर फिरत असलेला युजीसीचा अहवाल आजपर्यंत आम्हाला प्राप्त झाला नसल्याचे स्पष्टीकरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.
महाविद्यालयांच्या परीक्षा कधी होणार, किंवा महाविद्यालये कधी सुरू होणार याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीचा एक अहवाल सोशल मीडियावर फिरत आहे. याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना विचारले असता, युजीसीचा अहवाल सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र, तो अद्यापपर्यंत मंत्रालयापर्यंत काही आलेला नसल्याचे सामंत यांनी म्हटले आहे.
तसेच अहवाल जरी आमच्यापर्यंत आला नसला तरी युजीसीने ज्या काही बाबी म्हटलेल्या आहेत, त्याचा अभ्यास विभागाने सुरू केला आहे. तो योग्य आहे की, नाही याचा खुलासा कमिशनरसमोर केला जाईल, आणि कमिशनसमोर गेल्यानंतर युजीसीचे अध्यक्ष जेव्हा त्याला मान्यता देतील आणि अध्यक्षांचे अधिकृत पत्र ज्यावेळी शासनाला येईल, विद्यापीठाला येईल त्याचवेळी तो आम्ही ग्राह्य धरू. पण सध्या सोशल मीडियावर जो युजीसीचा अहवाल आला आहे, त्याचा आम्ही अभ्यास करतोय, त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतोय, शैक्षणिक वर्ष नेमके कधी असावे याबाबत आम्ही चर्चा करतोय. पण युजीसीचा अहवाल किंवा युजीसीचे अधिकृत पत्र आजपर्यंत आम्हाला प्राप्त झालेले नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.