रत्नागिरी - चिपळूणमधील एका नदीत अज्ञाताने प्रदूषणकारी रसायन सोडल्याने नदीचे पाणी पांढरे झाले आहे. चिपळूणमधील मुंढे परिसरासह कोसबी, फुरुस या गावातून ही नदी वाहते. रसायन नेमकं कोणी सोडलं, याचा शोध सध्या सुरू आहे. डेरवणपासूनच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत. आमदार शेखर निकम यांनी याप्रकरणी सखोल चौकशीच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोमवारी घटनास्थळी जाऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले.
दरम्यान रसायनामुळे फेसाळलेले पाणी नदीपात्रात साचल्याने आमदार शेखर निकम यांनी गडनदी धरणातून पाणी सोडण्याची सूचना केली होती. त्यानुसार पाटबंधारे खात्याकडून धरणातून पाणी सोडण्यात आले. मुंढे गावातून वाहत येणारी नदी कोसबी, फुरुस या गावानंतर कुटरेमार्गे थेट संगमेश्वर तालुक्यातील गडनदीला जोडली जाते. या नदीलगतची अनेक गावे पाण्यासाठी या नदीवर अवलंबून असून मासेमारीही मोठ्या प्रमाणावर होते. मात्र शनिवारी रात्री अज्ञाताने या नदीत फुरुसदरम्यान रसायन टाकले. त्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे. यामुळे आता नदीत माशांचा खच पडू लागला आहे. पोलीस संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहेत.