रत्नागिरी - जिल्ह्यात सकाळपासून मोठ्या उत्साहत मतदानाला सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघात एकूण 32 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण 13 लाख 11 हजार 397 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पोलीस प्रशासनाने देखील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
जिल्ह्यातील दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या 5 विधानसभा मतदारसंघात एकूण 32 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दापोली मतदासंघात सर्वाधिक 11 तर चिपळूण मतदारसंघात कमी 3 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गुहागर मतदारसंघात 5, रत्नागिरी - 6 तर राजापूर मतदारसंघात 7 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात 13 लाख 11 हजार 397 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 842 सैन्य दलातील मतदारांचाही समावेश आहे. तसेच 5 हजार 397 पोस्टल मतदार आहेत. एकूण मतदारांपैकी स्त्री मतदारांची संख्या 6 लाख 82 हजार 774 तर पुरुष मतदारांची संख्या 6 लाख 28 हजार 613 एवढी असून तृतीयपंथी मतदारांची संख्या 10 आहे.
मतदानासाठी एकूण 1 हजार 703 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. यामध्ये दापोली मतदारसंघात 361, गुहागर - 322, चिपळूण - 334, रत्नागिरी - 346 तर राजापूर मतदारसंघात 340 मतदान केंद्रांचा समावेश आहे. एकूण 1 हजार 703 मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी 2 हजार 131 मतदान केंद्राध्यक्ष आणि सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष तर 4 हजार 262 इतर मतदान अधिकारी असे एकूण 8 हजार 524 मतदान अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
पोलिसांकडूनही सुमारे 3 हजार 178 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रेल्वे आणि गोव्याच्या 5 कंपन्या मागवण्यात आल्या आहेत.