रत्नागिरी - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदारांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी स्वीप अभियांनातर्गत शिवाजी स्टेडियम, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे महारांगोळी काढण्यात आली होती. महारांगोळीच्या माध्यमातून मतदानाचा संदेश देण्यात आला. दरम्यान जिल्हयातील सर्व मतदारांनी 21 ऑक्टोबरला मतदान करुन लोकशाहीच्या या उत्सवात आपला सहभाग नोंदवावा, सर्वांनी या लोकशाहीच्या जागरामध्ये सहभागी व्हा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी केले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर.के. बामणे, अधिक्षक अभियंता, महावितरण पी.जी. पेठकर, निवडणूक निर्णय अधिकारी २६६ रत्नागिरी मतदार संघ तथा प्रांतधिकारी विकास सुर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, रत्नागिरीचे तहसिलदार शशिकांत जाधव, तहसिलदार वैशाली पाटील आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जिल्हयातील पाच मतदारसंघात होणाऱ्या या विधानसभा निवडणूकांमध्ये ८५०० कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. जिल्हयात असणाऱ्या दिव्यांग मतदारांना सहज मतदान करणे शक्य व्हावे यासाठी व्हीलचेअर्स, केंद्रावर रँम्प, तीनचाकी सायकाल आदि आवश्यक साहित्य उपलब्ध असणार आहे. त्यांना रांगेशिवाय थेट मतदान करता येणार आहे. मतदान केंद्रावर आणणे व परत घरी सोडणे यासाठी स्वतंत्र वाहने ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हयातील मतदानाच्या टक्केवारी बरोबर दिव्यांग मतदारांच्या मतदान टक्केवारीमध्येही नक्की वाढ होईल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.