रत्नागिरी - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज (बुधवारी) पुण्यतिथी आहे. या निमित्त सुरक्षेच्या कारणास्तव मागील अनेक दिवसांपासून बंद असलेली रत्नागिरी विशेष कारागृहातील सावरकरांची कोठडी सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली. आजच्या दिवसाचे महत्त्व ओळखून सावरकरप्रेमी आणि काही विद्यार्थ्यांनी या कोठडीत जाऊन सावरकरांना अभिवादन केले.
रत्नागिरी जिल्हा विषेश कारागृहात असणारी सावरकरांना ठेवलेली कोठडी सुरक्षेच्या कारणामुळे नागरिकांसाठी बंद करण्यात आली होती. सुरक्षेच्या उपाययोजना करून ही कोठडी पुन्हा नागरिकांना पाहण्यासाठी खुली करावी, यासाठी जिल्हा विशेष कारागृहाचे अशासकीय सदस्य सौरभ मलुष्टे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना विनंती केली होती. काही सामाजिक संस्थांनीही यासाठी निवेदन दिले होते. याची दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कारागृहाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांशी संवाद साधून २६ फेब्रुवारीला सावरकरांच्या पुण्यतिथी दिवशी कोठडी सर्वांसाठी खुली करावी अशी सूचना केली.
हेही वाचा - पुण्यतिथीदिनीच सावरकरांचा गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला
त्यानुसार कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पांडे यांनी रत्नागिरीच्या कारागृहाचे अधीक्षक देशमुख यांना ही कोठडी २६ फेब्रुवारीला सर्वांसाठी खुली करावी, असे आदेश दिले. त्यानंतर ही कोठडी सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली. बुधवारी सकाळपासून नागरिकांनी कारागृहात गर्दी केली होती.
ब्रिटीश सरकारने सावरकरांना ५० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावल्यानंतर रत्नागिरीत त्यांना २३ सप्टेंबर १९२३पर्यंत ठेवण्यात आले होते. पुढे त्यांना पुणे येथील येरवडा कारागृहात पाठवण्यात आले. ६ जानेवारी १९२४पासून पुन्हा रत्नागिरीतच स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते.