रत्नागिरी - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे डेरवण येथील बी. के वालावलकर महाविद्यालयात कोविड-19 चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात यावी, अशी मागणी लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या या पत्रामध्ये राऊत यांनी म्हटले आहे की, सध्या कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुळातच कोकणातील हे जिल्हे पुरेशा आरोग्य सोयी-सुविधापासून वंचित राहिले आहेत. कोकणातील जिल्हयांना मुंबई, कोल्हापूर आणि गोवा यांचेवर औषधोपचारासाठी अवलंबून राहावे लागत आहे. त्यात सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वॅब चाचणीच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे, रुग्णांचे अहवाल नमुने प्राप्त होईपर्यंत बराच कालावधी लागतो. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून, वैद्यकीय यंत्रणेवर येणारा ताण कमी व्हावा आणि रुग्णांचे अहवाल नमुने लवकरात लवकर प्राप्त व्हावेत. यासाठी जनहिताच्या आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचारी हिताच्या दृष्टीने डेरवण सावर्डे बी. के. महाविद्यालय येथे कोविड-19 चाचणी प्रयोगशाळा सुरू करावी.
रत्नागिरी जिल्ह्यात डेरवण, सावर्डे (ता.चिपळूण ) येथे बी. के. वालावलकर हे एकमेव रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय आहे. त्यामुळे या ठिकाणी कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा सुरू करावी, अशी आमची सर्व लोकप्रतिनिधींची तसेच कोकणवासीयांची इच्छा आहे. जेणेकरून स्वॅब टेस्टिंगचे काम जलदगतीने होऊ शकेल आणि कोरोना पासून बचाव होईल. कृपया आपण वैयक्तिक लक्ष घालून आमची ही मागणी मान्य करावी, अशी विनंती खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.