रत्नागिरी - गेले काही दिवस रिफायनरीवरून ( Nanar Refinery ) वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. त्यातच शिवसेनेकडूनही या ( Shivsena Reaction On Nanar Refinery ) प्रकल्पाबाबत सकारात्मक वक्तव्ये येत आहेत. त्यामुळे रिफायनरी विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. रिफायनरी प्रकल्प विरोधकांनी आज भव्य मोर्चा काढून रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशी जोरदार मागणी केली. शहरातील कोदवली नदीपात्रातील खर्लीपात्र ते तहसिलदार कार्यालय ( Agitation Against Nanar Refinery In Ratnagiri ) असा हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’,‘ एकच जिद्द, रिफायनरी रद्द, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
रिफायनरी विरोधात शासनाला निवेदन - बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेच्यावतीने शासनाला निवेदन देण्यात आले. त्यामध्ये बारसू-सोलगाव-धोपेश्वर पंचक्रोशीमध्ये प्रदूषणकारी प्रकल्प प्रस्तावित करू नये अशी मागणी केली. तसा प्रकल्प प्रस्तावित केल्यास त्याला ठाम विरोध राहील अशी भूमिकाही त्यांनी यावेळी स्पष्ट केली. हे निवेदन तहसिलदार शितल जाधव यांच्याकडे बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, नेते अशोक वालम, सत्यजित चव्हाण यांच्यासह अन्य ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सुपूर्द केले.
ग्रामस्थांचा मोर्चा - तालुक्यातील धोपेश्वर परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्प उभारण्याच्या शासन स्तरावरून हालचाली सुरू असून तसे संकेतही केंद्र आणि राज्य शासनाकडून देण्यात येत आहे. तर, कोकण दौर्यावर असलेले राज्याचे पर्यावरणमंत्री आदीत्य ठाकरे यांनीही प्रकल्प उभारणीच्यादृष्टीने सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे राजापूरमध्ये रिफायनरी प्रकल्प होणार असल्याचे संकेत मिळत असताना प्रकल्प विरोधकांसह ग्रामस्थांनी आज जोरदार मोर्चा काढीत प्रकल्पाला ठाम विरोध असल्याचे दाखवून दिले आहे.
तहसील परिसरात घोषणाबाजी - खर्ली नदीपात्रातून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये विविध गावांमधील तरूणांसह महिला, जेष्ठ ग्रामस्थ मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. खर्ली पात्रातून सुरू झालेला हा मोर्चा पायी तहसिलदार कार्यालयावर धडकला. यावेळी जवाहरचौकातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकालाही मोर्चेकर्यांनी अभिवादन केले. तहसिलदार कार्यालयाच्या आवारामध्ये आल्यानंतर मोर्चेकर्यांनी एकच गर्दी करीत जोरदार घोषणाबाजी सुरू करीत तहसिलदार कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.